मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ‘ईडी’ ने घेरले !! २२ ऑगस्टला हजेरी , हे तर सुडाचं राजकारण : राज

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून येत्या गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारने सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला असून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही उद्या ईडीकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर आयएलएफएसला मोठं नुकसान झालं होतं. त्या प्रकरणाचा ईडीने आता तपास सुरू केला असून याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी कोहिनूरसाठी जागा खरेदी घेतली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्यानंतर आयएलएफएसचं मोठं नुकसान झालं होतं. पुढे २००८ मध्ये राज यांनी शेअर्स विकून या कंपनीतून अंग काढून घेतले होते. मात्र त्यानंतरही राज या कंपनीत सक्रिय राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्याचं जराही आश्चर्य वाटत नाही. सरकार हे सूडाचं राजकारण करत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला मुळीच भीक घालत नाही. राज यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केल्यानेच त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.