कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे महापूराचा फटका बसला होता. या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. गेल्या २-३ दिवसात पावसाने उघडीप घेतल्यामुळे येथील नागरिकांना काहीचा दिलासा मिळाला आहे. पण अद्यापही नदीच्या काठचे पाणी कमी झालेले नाही. अशातच हवामान विभागाने या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तास कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.
जवळ जवळ एक आठवडा महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा येथील हवामान विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे. १३ आणि १४ रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा पाऊस सुरु झाला तर या दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. सध्या पूराचे पाणी ओसरत आहे आणि नागरिकांचे जीवन पुन्हा मार्गावर येत आहे.
हवामान विभागाने कोल्हापूर आणि सांगली सोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यातील रायगड जिल्ह्याला १६ तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा फटाक बसण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे. याच दिवशी मच्छीमार समुद्राची पूरा करुन मासेमारीला सुरुवात करतात. पुण्यातील काही भागात देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जनावरे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले होते. शेती देखील पाण्याखाली गेल्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. या सर्व परिस्थितीतून बाहेर पडत असताना आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पुढील ४८ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.