जम्मूमध्ये संचारबंदी उठवली, आजपासून शाळा शाळा , महाविद्यालये उघडणार

Sushma Chauhan, Deputy Magistrate (DM) Jammu District: Section 144 (gathering of more than 4 people banned) withdrawn from Jammu Municipal limits. All school, and colleges to open tomorrow (August 10). pic.twitter.com/EezNKkIKpu
— ANI (@ANI) August 9, 2019
जम्मूमधून कलम १४४ (जमावबंदी) हटवण्यात आलं आहे. शनिवार म्हणजेच १० तारखेपासून सर्व शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. मात्र इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याची घोषणा करण्याआधीच सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं होतं. आज शुक्रवार असल्याने नमाज पठणासाठी १४४ कलम शिथील केली जाईल अशी शक्यता आधी व्यक्त केली जात होती.
अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जमावबंदी हटवण्यात आली असल्या कारणाने सुरक्षा यंत्रणांना सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील परिस्थितीचा आढवा घेतला गोता. गुरुवारी श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मलिक यांनी शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या सामान्यांना काहीही त्रास होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेतला होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमावबंदी लागू असतानाही उत्तर काश्मीरमध्ये पाच तर दक्षिण काश्मीरध्ये दगडफेकीच्या दोन घटना घडल्या होत्या. तर दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. १३ जुलै पासून ८ ऑगस्टपर्यंतच्या काळात पाकिस्तानने सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये शोपियान, पुलवामा, अनंतनाग आणि सोपोर या जागांचा समावेश आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ३०० जणांना ‘जॉइण्ट अॅक्शन कमिटी’चे बॅनर घेऊन एक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आंदोलकांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “आम्हाला एकत्र राज्य हवं आहे. जम्मू, लडाख आणि काश्मीर एकत्रच असायला हवे. आम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी लढत आहोत,” अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि नॅशनल कॉन्फर्नसचे नेते कमर अली अखून यांनी दिली.