EVM : कुणी कितीही मागणी करु द्या, पुन्हा मतपत्रिका नाहीच : मुख्य निवडणूक आयुक्त

देशातील विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात देशभरात आवाज उठवला जात असतानाच या मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिका वापरण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी स्पष्ट फेटाळून लावली.
या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाने गतकाळात दिलेल्या काही आदेशांचा आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते असे सांगत, मतदानासाठी पुन्हा मतपत्रिका वापरल्या जाव्यात अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
तेलुगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ईव्हीएमना विशेषकरून विरोध असून, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांना पत्रकारांनी येथील विमानतळावर विचारणा केली असता, मतपत्रिका पुन्हा वापरात आणल्या जाण्याची शक्यता त्यांनी स्पष्ट फेटाळून लावली. पश्चिम बंगालच्या न्यायिक विज्ञान विद्यापाठ आणि आयआयएमने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी अरोरा शहरात आले होते.
कश्मीर निवडणुका सूचनेनंतर जम्मू-काश्मीरच्या विभाजनच्या पार्श्वभूमीवर तेथे विधानसभा निवडणुका घेण्याबाबत विचारले असता, ‘केंद्रीय गृहमंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालयाने अधिकृत सूचना केल्यानंतरच विचार करण्यात येईल. निवडणूक आयोग त्याच्या प्रतीक्षेत आहे’, असे अरोरा म्हणाले.