Jammu & Kashmir : जुम्माची नमाज अदा करण्यासाठी काही काळासाठी आज संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय

जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर संचारबंदीमुळे काश्मीर खोऱ्यात शांतता आहे. इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न उपस्थित झाला नाही. पण आता मात्र काश्मीरमधली संचारबंदी शुक्रवारच्या नमाजसाठी थोडा वेळ शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळेच यावेळी हिंसक निदर्शनं होऊ नयेत याची खबरदारी सुरक्षादलांना घ्यावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये आतापर्यंत दगडफेकीच्या काही तुरळक घडना घडल्या. यामध्ये उत्तर काश्मीरमध्ये पाच आणि दक्षिण काश्मीरमध्ये दोन घटनांची नोंद झाली. त्याचवेळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वेळोवेळी उल्लंघन होतं आहे. 13 जुलैपासून आतापर्यंत सात वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या घटनाही घडल्या.
काश्मीरमध्ये शोपियान, पुलवामा, अनंतनाग, सोपोर या भागांत हिंसक पद्धतीने निदर्शनं होऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. याठिकाणी सुरक्षादलं जास्त खबरदारी घेत आहेत. काश्मीरच्या अंतर्गत भागात दुपारी आणि संध्याकाळी दुकानं उघडली जातायत.
काश्मीरमधलं कलम 370 हटवल्याच्या निषेधार्थ निदर्शनं करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस आणि निदर्शकांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे काही आंदोलकांवर कारवाई करण्यात आली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मंत्री कमर अली अखून म्हणाले, आम्हाला अखंड राज्य हवं आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाख एकत्रच असले पाहिजेत. आमची लढाई सरकारच्या निर्णयाविरोधात आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात शांततेने निदर्शनं करण्याचा अधिकार आम्हाला आहे, केंद्र सरकारने आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली आहे, असंही काँग्रेसचे नेते नसीर हुसेन मुन्शी यांचं म्हणणं होतं.