Jammu & Kashmir Article 370 : पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले

Pakistan Sources: Government of Pakistan to not send its High Commissioner designate to India who was to take charge later this month. Pakistan may also ask Indian High Commissioner to Pakistan Ajay Bisaria to leave Pakistan pic.twitter.com/Ur0iJl5Xyl
— ANI (@ANI) August 7, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने कलम ३७० हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर सर्तक राहण्याचेही निर्देश दिले आहेत. इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पाकिस्तानचे लष्करी अधिकारीही उपस्थित होते. जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० रद्द करुन दोन भागांमध्ये विभाजन करण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेपाठोपाठ काल लोकसभेतही मंजूर झाले. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश बनणार आहेत. पाकिस्तानी लष्कराची काल काश्मीरसंबंधी विशेष बैठक झाली. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने काश्मीरसाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ असे म्हटले आहे. भारताच्या निर्णयावरुन पाकिस्तानची आगपाखड सुरु आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आणखी पुलवामा घडतील असेही म्हटले आहे.