Kolhapur : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील “गुफतगू” ची चर्चा !!

विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची पळवा पळवी सुरु असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचे वृत्त आहे. कोल्हापुरात एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली. विशेष म्हणजे उभय नेत्यांमध्ये तब्बल ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे . महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली. एकमेकांचे विरोधक असलेल्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भेटल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये शनिवारी एक दुर्मिळ राजकीय योगायोग पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि त्याच वातावरणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाचं. पत्रकार संघाचे विभागीय कार्यालय कोल्हापूर मध्ये सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते.
यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले कि , चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर या माझ्या शुभेच्छा व्यक्तिगत असून मी जातीवादाला थारा देत नाही. त्यांचचे भाषण सुरू असताना स्टेजवरील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी ते पण पाटीलच आहेत, असे म्हटल्यावर आडनावात काय आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.