मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर हजारो टन कचरा

मुंबई शहर आणि उपनगारांसहीत महाराष्ट्रभर मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबईमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास भरतीच्या ४.९ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचे पहायला मिळाले. या लाटांनी हजारो टन कचरा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर फेकला आहे. मरीन ड्राइव्हवर तर महापालिकेचे कर्मचारी हजारो किलो कचरा साफ करतानाचा चित्र या भरतीच्या लाटा येऊन गेल्यानंतर दिसले. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मरिन ड्राइव्हवर जवळजवळ २५ मेट्रीक टन (२५ हजार किलो) कचरा साफ केला आहे. अजूनही मरिन ड्राइव्हवरील हे साफसफाईचे काम सुरु आहे. मरिन ड्राइव्हबरोबरच मागील काही दिवसांमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांनी गिरगाव चौपाटीवरुन पाच मेट्रीक टन म्हणजेच ५ हजार किलो तर दादर आणि माहिम चौपाटीवर ५० मेट्रीक टन म्हणजेच ५० हजार किलो कचरा साफ केला आहे. त्याच प्रमाणे वर्सोवा आणि जुहू चौपाटीवर १ लाख १० हजार किलो तर गोराई किनारपट्टीवरुन ८ हजार किलो कचरा साफ केला आहे.