Jammu & Kashmir : ३५ अ वरून वातावरण तापले , आज मध्यरात्री होतेय स्थानिक पक्षांची बैठक

You failed to win over the love of a single Muslim majority state which rejected division on religious grounds & chose secular India. The gloves are finally off & India has chosen territory over people.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 2, 2019
कलम ३५ अ वरून जम्मू काश्मीरमधील वातावरण अधिक तप्त झाले असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक पक्षांनी रात्री १२ वाजता बैठक बोलवली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकार काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शंका असल्याने ही बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून २८० सैन्याच्या तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने भारतीय लष्कर आणि हवाई दलाल हाय अलर्टलवर ठेवलं आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि सीमारेषेवर तैनात इतर जवानांना काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच या बैठकीत आपल्या आयएएस पदाचा राजीनामा देऊन राजकारणात पाऊल ठेवलेले शाह फैजल हेदेखील सहभागी होणार आहेत. केंद्र सरकाने काश्मीरमध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकड्या पाठवल्या आहेत. यापूर्वी काश्मीर खोऱ्यात १० हजार आणि त्यानंतर २८ हजार जवानांना तैनात केले आहे. तसेच केंद्र सरकार कलम ३५ ए हटवण्याच्या तयारीत असल्याची भीती जम्मू काश्मीरमधील नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
गुरुवार संध्याकाळपासूनच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालत आहेत. हा ऑपरेशनल अलर्टचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. जवानांची संख्या वाढवल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही गस्त घातली जात आहे. दरम्यान यावरुन जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे. “काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीसाठी लष्कर आणि हवाई दलाला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे ? हे ३५ ए बद्दल नाही. जर अशा प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आला असेल तर हे काहीतरी वेगळं आहे,” असे ओमर अब्दुल्ला ट्विटरवरून म्हणाले. तर दुसरीकडे महबूबा मुफ्ती यांनीदेखील ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या राज्याने फाळणीदरम्यान धर्मनिरपेक्ष राज्यासोबत जायचं ठरवलं अशा एकमेव मुस्लिमबहुल राज्याचे प्रेम जिंकण्यात तुम्ही अयशस्वी ठरलात. आता गोष्टी बदलल्या असून भारताने लोकांपेक्षा एका प्रदेशाची निवड केली आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.