राजनाथ यांची सिंह गर्जना : महाराष्ट्रात २५० जागा मिळणार आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार !!

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती कायम राहणार असून २५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या निर्धाराने कामाला लागा, असे आवाहन करतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार व देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार, असा विश्वास देशाचे संरक्षण मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित महाजनादेश यात्रेला आजपासून अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून प्रारंभ झाला. यावेळी बोलताना राजनाथ यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते मात्र नंतर शिवसेनेसोबत युती झाली आणि फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचं सरकार चालवलं. यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत आणि एकजुटीने विधानसभा निवडणूक लढणार असल्याने दोनशे प्लस नव्हे तर २५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आपले लक्ष्य असले पाहिजे, असे राजनाथ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. ते ज्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहता फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहेत, असे मी म्हणेन. गेल्या पाच वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकण्याचे काम केले आहे आणि पुढच्या पाच वर्षांत ते जनतेची मने जिंकणार आहेत, असा विश्वास राजनाथ यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जो संकल्प घेऊन फडणवीस चालले आहेत ते पाहता येत्या काळात राज्यातील एकही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली राहणार नाही व शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबतील, अशी मला आशा आहे, असेही राजनाथ पुढे म्हणाले.
दरम्यान सीमेवर पाकिस्तानातून गोळी चालली तर इतके दिवस सफेद झेंडा दाखवून चर्चेसाठी संदेश धाडला जायचा मात्र मी हे थांबवले आहे. सीमेपलीकडून गोळी चालली तर त्याला गोळीनेच प्रत्युत्तर द्या आणि गोळ्या किती चालल्या हे मोजू नका, असा आदेश मी लष्कराला दिला आहेत, असे राजनाथ म्हणाले. भारताने कधीही कुणाच्या हद्दीत घुसखोरी केली नाही मात्र आमची कुरापत कुणी काढली तर त्याला अद्दल घडवायची. तशीच वेळ आली तर त्याच्या घरात घुसून मारायचं, हे आम्ही बालाकोट हवाई हल्ल्याद्वारे दाखवून दिले आहे. यापुढेही आमच्यावर कुणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशाराच राजनाथ यांनी दिला.