पुणे – खडकवासला धरण १०० टक्के भरले, भिडे पूल पाण्याखाली

पुणे शहरात मागील आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या चार धरणांपैकी खडकवासला धरण १०० टक्के भरले असून या धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे झेड ब्रीज खालील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. हे दृश्य पाहण्यास पुणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी पानशेत धरणात ८.८९ टीएमसी (८३.५१ टक्के), वरसगाव धरण ८.७६ टीएमसी (६८.३५ टक्के) भरले असून टेमघर धरणात २.२५ टीएमसी (६०.६४ टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी असून सद्यस्थितीला १०० टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणातून १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या चारही धरणात मिळून २१.८८ टीएमसी (८६.६७ टक्के) पाणीसाठा पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणार्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.