Uttar Pradesh : उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला अपघात अखेर भाजपा आमदाराविरोधात “एफआयआर”

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कारला झालेल्या अपघाताप्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर, त्याचा भाऊ आणि अन्य आठ जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रविवारी रायबरेलीमध्ये बलात्कार पीडितेच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये पीडित तरुणी आणि तिचा वकिल गंभीररित्या जखमी झाला आहे तर पीडितेच्या दोन महिला नातेवाईकांचे निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने या अपघाताची दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. उत्तर प्रदेश सरकार काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी सरकारला याबद्दल कळवले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जाणार आहे. केंद्र सरकारला अद्यापपर्यंत यासंबंधी पत्र पाठवलेले नाही.
पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी एक बंदुकधारी पोलीस आणि दोन महिला कॉन्स्टेबल तैनात असतात. अपघाताच्यावेळी मात्र ते तिच्यासोबत नव्हते असे उन्नावचे पोलीस अधीक्षक एमपी वर्मा यांनी सांगितले. अपघातानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा ट्रकची नंबर प्लेट काळयारंगाने रंगवण्यात आलेली होती. पीडित तरुणीच्या आईने अपघातासाठी कुलदीप सिंह सेनगरला जबाबदार धरले आहे.