धक्कादायक : भोसरी सामूहिक आत्महत्या प्रकरणी मयत पत्नी आणि पतीवरच लागले आरोप , पतीला पोलिसांनी केली अटक

#UPDATE Medical reports confirm that the two girls (aged 9 and 7 years) were rape victims. Case registered. One accused has been arrested. Investigation still underway. https://t.co/o3BzI15vNs
— ANI (@ANI) July 29, 2019
भोसरीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा धक्कादायक वळण लागले असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार स्वत:च्या दोन मुली आणि मुलाला मातापित्यांनी गळा दाबून मारण्यापूर्वी पित्यानेच दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाल्याने भोसरीत रविवारी घडलेल्या या प्रकरणाला दुसऱ्या दिवशी वेगळी कलाटणी मिळाली आहे. याप्रकरणी पती-पत्नीवर खून, बलात्कार, बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोटच्या नऊ व सात वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या मुलाला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास देऊन आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी (२८ जुलै) उघडकीस आले होते. यावेळी पती कामधंद्याच्या शोधासाठी घराबाहेर पडला होता. तो परत आल्यावर त्याने घरमालकाच्या मदतीने पोलिसांना बोलावून घराचे दार तोडले. तेव्हा तिन्ही मुले एकाच हुकला नॉयलॉन दोरीने लटकलेल्या अवस्थेत होते. तर पत्नी आतील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात दोन्ही मुलींवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. तसेच तिन्ही मुलांना प्रथम गळा दाबून मारले व नंतर लटकवले हे देखील उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरवात केली.
त्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आले. आर्थिक विवंचनेत असलेले हे कुटुंब चारच दिवसांपूर्वी भोसरीत राहण्यासाठी आले होते. आर्थिक विवंचनेत असल्याने मुलांना मारून आपण आत्महत्या करू, असे पतीने पत्नीला सांगितले. तिन्ही मुलांना दोघांनी मारल्यानंतर पती घराबाहेर पडला. मी घराबाहेर जाऊन आत्महत्या करतो, असे त्याने पत्नीला सांगितले होते. त्यामुळे तिने घराला आतून कडी लावून घेत दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, पतीने हा सर्व प्रकार केल्यानंतर तो पुन्हा घरी परतला. त्याने पत्नीने मुलांना मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. परंतु, शवविच्छेदन अहवालानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दरम्यान, पत्नी आणि तिच्या मुलांचे मृतदेह माहेरच्या लोकांनी लातूर येथे अंत्यसंस्कारासाठी नेले. निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे तपास करीत आहेत.