चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्यांना भाजपमध्ये घेतले जाणार नाही : देवेंद्र फडणवीस यांचा पवारांवर पलटवार

‘दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नसून, शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे’, अशा शब्दांत मुख्यमंत्रीफडणवीस यांनी पवार यांना पलटवार केला आहे. ज्या नेत्यांची ईडी चौकशी करत आहे, अशा लोकांना भारतीय जनता पक्षात कधीही घेतले जाणार नाही. जे चांगले आहेत, लोकांची कामे करतात अशांनाच पक्षात घेतले जाईल, असेही फडणवीस म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.
भारतीय जनता पक्षाकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास उत्सुक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र ज्याची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे अशांना आम्ही घेणार नाही. कुणाला दबाव टाकून पक्षात घेण्याइतका आमच्याकडे वेळ नाही. भारतीय जनता पक्ष कुणाच्या मागे धावेल अशी पक्षाची स्थिती नाही, असेही फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्षाने कधीबी दबावाचे राजकारण केले नाही. आमच्याकडे मोदी यांच्यासारखा मोठा नेतै आहे, असे सांगत लोक का बाहेर जातात याबाबत पवार यांनी आत्मचिंतन करायला हवे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
आमच्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. अनेक साखर कारखानदारांना मदत केली आहे. त्यावेळी आम्ही त्यांना त्या बदल्यात पक्षात या असे कधीही म्हटले नाही, याकडेही मुख्यमंत्र्यानी लक्ष वेधले.