भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप करणारी पीडिता अपघातात गंभीर जखमी, आईसह तीन ठार, काँग्रेसची चौकशीची मागणी

भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर आरोप करणारी उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडित तरूणीच्या आई व काकूसह वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. तर, पीडित तरूणी आणि तिच्या वकीलास गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना लखनऊ येथील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित तरूणी कुटुंबासह रायबरेली तरूंगात असलेल्या आपल्या काकाची भेट घेऊन परत येत असताना हा अपघात घडला. त्यांच्या कारला ट्रकने उडवल्याने हा भयानक अपघात झाला. काँग्रेसने या अपघाताबाबत संशय व्यक्त केला असून, उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या आमदार आराधना मिश्रा यांनी याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. गुरबख्श गंज परिसरात विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक एवढी भीषण होती की, घटनास्थळी कारचा अक्षरशा चुराडा झाला. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे. फरार ट्रक चालकासह ट्रकच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहे.पीडित तरूणीच्या बहिणीने या अपघातमागे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या माणसांचा हात असल्याचा आरोप केला आहे. घटनेचा तपास करण्यासाठी फॉरेंसिक टीम घटनास्थळी रवाना झालेली आहे.
मागच्यावर्षी नोकरीच्या निमित्ताने १७ वर्षीय पीडित तरुणी कुलदीप सिंह सेंगरला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने बलात्कार केला असा आरोप तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले होते.
UP Congress MLA, Aradhana Mishra: Unnao rape victim met with an accident today under suspicious circumstances, two members of her family have died in the accident. Congress party demands an investigation. pic.twitter.com/NvqrkjziEc
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 28, 2019