अकोल्याच्या विकासासाठी पिचड पिता-पुत्रांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीला सोडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा आज केली. अकोले येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ३० किंवा ३१ जुलैला त्यांचा भाजपात प्रवेश होणार असून त्यानंतर १७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची अकोलेत सभा होणार आहे.
अकोले येथे आज पिचड समर्थकांचा मेळावा झाला. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कालच राजीनामे दिले आहेत. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले,
‘आपल्यावर अनेक राजकीय वार झाले. व्यक्तिगत टीकाही झाली. मात्र, आपला कोणावरही राग नाही. आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार यांची मोठी साथ मिळाली. मात्र, आता देश बदलला आहे. वातावरण बदलत आहे. विकासाच्या बाजूने जायचे की प्रवाहाच्या विरोधात, हा प्रश्न होता. मात्र, आता आम्ही विकासाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला आहे. आता मला राजकारणात काहीही मिळवायचे नाही. यापुढे कोणतीही निवडणूक मी लढविणार नाही. भाजप प्रवेशाचे ठरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची मनमोकळी चर्चा झाली. अन्य नेत्यांसोबतही चर्चा झाली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रत्येकवेळी आमच्यासोबत होते.’
आमदार पिचड म्हणाले, ‘अकोल्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, मागील पाच वर्षांत फक्त तीन किलोमीटरचा रस्ता करू शकलो. विरोधी पक्षात राहून काम करता येणार नाही हे यावरून कळले. त्यामुळे पक्ष बदलायचा आहे. मनात प्रचंड वेदना होत आहेत. भाजपची कामाची पद्धत आवडली. त्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल, म्हणून आपण भाजपात जात आहोत.’