आतापर्यंत असेल १ हजार ४५८ कायदे रद्द , आणखी ५८ कायदे रद्दबातल करण्याबाबतचे विधेयक : ओम बिर्ला

संसदेने ब्रिटिशकाळातील कायदे रद्द करून त्याजागी नवे कायदे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे महत्त्वपूर्ण मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज सभागृहाच्या कामकाजादरम्यान व्यक्त केले मोदी सरकारने जुने आणि कालबाह्य कायदे रद्द करण्याचे धोरण अवलंबले आहे. आतापर्यंत असेल १ हजार ४५८ कायदे रद्द करण्यात आले असून असे आणखी ५८ कायदे रद्दबातल करण्याबाबतचे विधेयक (रिपिलिंग अँड अॅमेन्डिंग बिल, २०१९) सरकारच्या वतीने लोकसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकावरील चर्चेदरम्यान टिपण्णी करताना सभापतींनी ब्रिटिशकालीन कायदे बदलायला हवेत, असे मतप्रदर्शन केले.
पश्चिम बंगालमधील सेरामपोरचे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या विधेयकावर बोलताना, ब्रिटिशांनी बनवलेले कायदे बदलण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा, असे मत मांडले होते. ब्रिटिशांनी कायदे बनवले त्यावेळची परिस्थिती आणि आजची स्थिती यात खूप बदल झाला असल्याने असे कायदे बदलणे ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. त्यावर नवे कायदे आणून ब्रिटिशकालीन कायदे रद्द करायला हवेत, अशी टिपण्णी ओम बिर्ला यांनी केली.