अडीच वर्षाच्या चिमुकलीचा खून

पिंपरी चिंचवड येथे अडीच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरणकरून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी भागात मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या कामगार वसाहतीमध्ये ही चिमुकली राहत होती. सोमवारी सायंकाळी ती राहत्या घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र तिचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलिटरी परिसरास आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सांगवी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तिच्या सोबत काही गैरप्रकार झाला आहे का याची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.