मुंबई : जुहू चौपाटीवर दोन मुली बुडाल्या

जुहू चौपाटीवर पोहत असताना दोन मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. चौपाटीवरील तैनात जीवरक्षकांनी या दोन्ही मुलींना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत या मुली बुडाल्या होत्या. आज सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी ही घटना घडली. अंधेरी कोळीवाड्याजवळ जुहू चौपाटीवर माया महेंद्र ही २९ वर्षाची तरुणी आणि निशा कंवलपाल सिंग ही १५ वर्षाची मुलगी पोहत असताना अचानक बुडायला लागल्या. या दोघींनीही जोरजोरात आरडाओरड सुरू केल्याने त्यांना वाचवण्यासाठी जीवरक्षक सरसावले. पण जीवरक्षक पोहोचे पर्यंत या दोघी बुडाल्या होत्या, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या दोघींचे मृतदेह कूपर रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.