मायावतींचे भाऊ आणि बसपा उपाध्यक्ष आनंद कुमार यांच्यावर आयकर विभागाची कारवाई, ४०० कोटींचा प्लाॅट जप्त

बसपा प्रमुख मायावती यांचे भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात आज आयकर विभागाने मोठी कारवाई केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांचा एक निनावी प्लॉट ताब्यात घेतला आहे. हा प्लॉट नोएडा येथे असून त्याची किंमत ४०० कोटी आहे.
आयकर विभागाने आज आनंद कुमार यांच्या घरी जाऊन ही कारवाई केली असून त्यांच्या संपत्तीची झाडाझडती अद्यापही सुरूच आहे. यावेळी आनंद कुमार यांच्याकडे नोएडामध्ये २८,३२८ स्क्वेअर मीटरचा एक निनावी प्लॉट असल्याचं आढळून आलं. सात एकरामध्ये पसरलेल्या या प्लॉटची किंमत सुमारे ४०० कोटी आहे.
दिल्लीतील बीपीयूने या निनावी प्लॉटला जप्त करण्याचे १६ जुलै रोजी आदेश दिले होते. त्यामुळे आज आयकर विभागाने हा प्लॉट जप्त केला आहे. आनंद कुमार यांच्या आणखी काही बेहिशोबी मालमत्तांची माहिती आपल्याजवळ असल्याचा दावा आयकर विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. भविष्यात या मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्याचं थेट कनेक्शन मायावतींशी असल्याचंही बोलले जात आहे.
दरम्यान, आनंद कुमार याच्या १३०० कोटीच्या संपत्तीची तपासणी सुरू आहे. २००७ ते २०१४ पर्यंत आनंद कुमार यांच्या संपत्तीत १८००० टक्क्याने वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती ७.१ कोटीने वाढून १,३०० कोटी झाली आहे. त्यांच्या १२ कंपन्याही आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत.