Honor Killing : बहीण आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या करणाऱ्या भावाला फाशी तर चुलत भावाला जन्मठेप

भोकर न्यायालयाने थेरबन येथील ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपीला फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विवाहीत बहीण प्रियकरासोबत पळून गेल्याने तिच्या सख्ख्या भावाने दोघांची निर्घृण हत्या केली होती. २३ जुलै २०१७ रोजी भोकर तालुक्यातील थेरबन येथे हे दुहेरी हत्याकांड घडले होते.
थेरबन येथील २२ वर्षीय पूजा हिचा विवाह भोकर येथील ज्योतिबा हसेन्ना वर्षेवार याच्यासोबत झाला होता. परंतु लग्नापूर्वी ३ वर्षांपासून पूजा हिचे गावातील गोविंद कराळेसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी पूजा सासरहून कुणालाही न सांगता प्रियकर गोविंद कराळेसोबत पळून गेली होती. पूजाचा पती ज्योतिबा वर्षेवार याने भोकर पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, पूजाच्या प्रेमसंबंधाची माहिती तिचा भाऊ दिगंबर दासरे याला होती. त्याने गोविंदला फोन करून संपर्क साधला. तो कुठे आहे, याबाबत माहिती घेतली. त्याच्यासोबत पूजाही असल्याची माहिती दिगंबर दासरे याला मिळाली होती. पूजा आणि गोविंद तेलंगणातील खरबाळा येथे होते. खरबाळा येथे गोविंदची बहिण राहते. या माहितीच्या आधारे दिगंबरने खरबाळा येथे जाऊन पूजा आणि गोविंदची भेट घेतली. दोघांना समज देऊन हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. परंतु पूजा ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तरी देखील दिगंबर दासरे २३ जुलै २०१७ रोजी दोघांना घेऊन भोकरकडे निघाला.
तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एका नाल्याजवळ दिगंबर याने चुलत भाऊ मोहन दासरे याच्या मदतीने गोविंद कराळे याच्या गळ्यावर विळा आणि कत्तीने वार करुन ठार मारले. नंतर दिगंबर याने सख्खी बहीण पूजाच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत पूजा रस्त्यावर आली. मदतीसाठी ती याचना करत होती. पण तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. मदत करण्याऐवजी रस्त्यावरील लोक तिचे फोटो काढत होते. काही वेळाने ती तिनेही प्राण सोडला.
भोकर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी दिगंबर दासरे आणि त्याचा चुलत भाऊ मोहन दासरे याला अटक केली. या खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी (18 जुलै) भोकर न्यायालयात झाली. न्यायाधीश एम.एस.शेख यांनी मुख्य आरोपी दिगंबर दासरे याला फाशी तर मोहन दासरे याला जन्मठेपची शिक्षा सुनावली.