बाबरी-अयोध्या विवाद : मध्यस्थ समितीला ३१ जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश, २ ऑगस्टपासून सुनावणी

अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आज कोर्टात अहवाल सादर केला असून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोर्टाने समितीला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर या प्रकरणावर २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता खुल्या कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यात मध्यस्थ समितीमार्फत या प्रकरणावर तोडगा काढायचा की याप्रकरणावर रोज सुनावणी करायची यावर निर्णय घेण्यात येणार असल्याच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज मध्यस्थ समितीचा प्रगती अहवाल स्विकारला. परंतु त्यांना ३१ जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत मध्यस्थ समितीला अयोध्याप्रकरणावर चर्चेतून तोडगा काढण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. २ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून त्यात मध्यस्थ समितीमार्फत याप्रकरणावर तोडगा काढायचा की कोर्टात दररोज सुनावणी करायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी एक पक्षकार गोपाल सिंह विशारद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी मध्यस्थ समितीमार्फत याप्रकरणावर अंतिम तोडगा निघणं अत्यंत कठिण दिसत असल्याचं म्हटलं होतं. मध्यस्थ समिती केवळ वेळ काढूपणा करत असून याप्रकरणी कोर्टाने स्वत: रोज सुनावणी करावी, अशी मागणी विशारद यांनी केली होती. त्यावर आज हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला.