Honor Killing : उच्चवर्णीय मुलीशी आंतरजातीय विवाह केल्यामुळे पोलिसांच्या समोर मागासवर्गीय तरुणाची निर्घृण हत्या

एका क्षत्रिय राजपूत कुटुंबानं मागासवर्गीय तरुणाचीनिर्घृण हत्या केल्याची घटना अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडल तालुक्यात घडली. मागासवर्गीय तरुणाची मुलीच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केल्यानं संतापलेल्या कुटुंबानं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं तिथून पळ काढला.
आमच्या मुलीसोबत लग्न करण्याची हिंमत कशी केलीस, असा प्रश्न विचारत क्षत्रिय-राजपूत कुटुंबातील सदस्यांनी २३ वर्षीय हरेश सोळंकीची हत्या केली. लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन, सुरा भोसकून हरेशची हत्या केली गेली. लग्नामुळे झालेला वाद मिटवण्यासाठी हरेश त्याची पत्नी उर्मिलाच्या घरी गेला होता. सामंजस्यातून प्रकरण निवळावं यासाठी त्यानं राज्य सरकारनं स्थापन केलेल्या अभयम पथकाला फोन केला होता. त्यामुळे उर्मिलाच्या घरी जात असताना अभयम पथकातील पोलीस अधिकारी त्याच्यासोबत होती. मात्र हरेशला मारहाण केली जात असताना या अधिकारी महिलेनं घटनास्थळावरुन पळ काढला.
हरेश सोळंकी एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतो. आठ महिन्यांपूर्वी हरेश आणि उर्मिला यांचा विवाह झाला. मात्र काही दिवसांपूर्वीच उर्मिलाच्या कुटुंबानं तिला घरी बोलावून घेतलं. आई आजारी असल्याचं कारण देऊन कुटुंबीय तिला घरी घेऊन गेले. त्यानंतर तिचा फोन काढून घेण्यात आला. त्यामुळे हरेशला चिंता वाटू लागली. त्यानं सासरच्या मंडळींसोबत झालेला वाद मिटवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मदत म्हणून अभयम या पोलिसांच्या महिलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाशी संपर्क साधला. मात्र वाद मिटवण्यासाठी गेलेल्या हरेशला उर्मिलाच्या कुटुंबीयांनी जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.