राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा : निवडणूक आयुक्तांनंतर सोनिया गांधी यांची घेतली भेट

दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नसले तरी ईव्हीएम वर आणि इतर राजकीय मुद्द्यांवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे . लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.
सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. तसंच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.