ICC World Cup 2019 : पाकिस्तानची बांगलादेशवर ९४ धावांनी मात, मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने ९४ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. विजयामुळे पाकिस्तानच्या खात्यात २ गुणांची भर पडली असली तरी स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पाकला समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशच्या संघाला २२१ धावांमध्ये गारद केलं. पाकने बांगलादेशसमोर विजयासाठी ३१६ धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिद पुन्हा एकदा चमकला. शाहिनने बांगलादेशचे ६ गडी बाद केले. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने सर्वाधिक ६४ धावा केल्या. तर लिटॉन दासने ३२ धावांचं योगदान दिलं. शाकिब आणि दास वगळता बांगलादेशच्या इतर एकाही फलंदाजांना मैदानात जम बसवता आला नाही.
तत्पूर्वी, पाकिस्तानचा सलामवीर इमाम उल हकने शतकी खेळी साकारून संघाला चांगली सुरुवात करून दिली. तर बाबर आझमने ९६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानला तीनशे धावांचा डोंगर उभारता आला.