राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलीनीला ३० दिवसांचा सशर्त जामीन

राजीव गांधी हत्या प्रकरणातली एक आरोपी नलिनी श्रीहरन हिला मद्रास हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. त्यामुळे नलिनी आता ३० दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी ‘पॅरोल’ मिळावा असा अर्ज तीने केला होता. त्यानंतर त्यावर राजकारणही झालं. अखेर सुरक्षा संस्थांनीही आढावा घेत आपला अहवाल कोर्टात दिला. त्यानंतर नलिनीला ‘पॅरोल’ म्हणजेच एक प्रकारची रजा मंजूर झाली. २१ मे १९९१ ला तामिळनाडूतल्या श्रीपेरंबदूर इथं मानवी बॉम्ब असलेल्या धनू हिने स्फोट घडवून राजीव गांधी यांची हत्या केली होती. या प्रकरणातली नलिनी ही आरोपी आहे. या स्फोटात 18 लोकांचा मृत्यू झाला होता.
नलिनीने चेन्नईच्या एका कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. नंतर ती एका खासगी कंपनीच स्टेनोग्राफर होती. हे काम सुरू असतानाच ती लिट्टे या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात आली. नंतर ती त्या संघटनेची कट्टर कार्यकर्ताच बनली. तीचा भाऊ भाग्यनाथनी लिट्टेचा कार्यककर्ता होता. रजेच्या काळात कुणालाही मुलाखत न देण्याची आणि राजकीय नेत्यांची भेट न घेण्याची अट न्यायालयाने घातली आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचनं, त्यांच्यातल्या आरोपींना पूर्ण मदत करणं, मानवी बॉम्ब असलेल्या धनूची सर्व व्यवस्था करणं, तीला घटनास्थळी पोहोचवणं अशी सगळी कामं नलिनीने केली होती. तिला हत्याकटाची पूर्ण माहिती होती अशी कबूलीही तिने दिले होती. त्यामुळे तिला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती.
नलिनीला जेव्हा अटक झाली त्यावेळी तीला दिवस होते. काही दिवसांनीच तीने एका मुलीली जन्म दिला. त्यामुळे नलिनीची फाशी माफ करण्यात आली. मुलगी अनाथ होऊ नये म्हणून तिने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला होता. तामिळनाडूतल्या राजकीय पक्षांनीही तीला माफ करावं अशी मागणी केली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनीही मानवतेच्या भूमिकेवरून नलिनीची फाशीची शिक्षा माफ करावी अशी विनंती राष्ट्रपतींना केली होती. त्यानंतर नलिनीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.
नलिनीची मुलगी लंडनला तिच्या नातेवाईकांकडे राहते. ती आता मोठी झाली असून तिचं लग्न ठरलंय. तिच्या लग्नाच्या तयारीसाठी नलिनीला रजा हवी आहे. तुरुंगातली तिची वागणूकही चांगली असल्याने तिला ही रजा मिळाली. काही वर्षांपूर्वी प्रियंका गांधी यांनी तुरुंगात जाऊन तिची भेटही घेतली होती.