Dabholkar Murder case : अॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर याच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले अॅड. संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून शुक्रवारी (दि.५) जामीन मंजूर करण्यात आला. ३०,००० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाने जामीन दिला आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर दोघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण न्यायाधीश रेट्टे यांनी पुनाळेकर आणि भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. त्यानुसार काल कोठडीची मुदत संपल्यानंतर कोर्टाने त्यांना आज (दि.५) ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दरम्यान, संजीव पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली होती. तसेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए)कायद्यानुसार त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.