महाराष्ट्रातील ” बीफ बंदी ” चा फैसला आता सर्वोच्च न्यायालयात

महाराष्ट्र सरकारने गायी आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी घालणारा निर्णय दिला होता. या बीफ बॅनच्या निर्णयावरून बराच वादंग माजला होता. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय कायम ठेवला होता. पण गाय आणि बैलांची कत्तल जर महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल तर मात्र बीफचा साठा करणं हा गुन्हा नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं. हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या काही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. पण या याचिकांवरच्या सुनावणीचा निर्णय देण्यातून इंदू मल्होत्रा यांनी अंग काढून घेतलं आहे. या याचिकाकर्त्यांची वकील म्हणून मी आधी काम केलं आहे. त्यामुळे मी या प्रकरणी निर्णय देऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकारच्या गोवंश हत्या बंदीच्या निर्णयाला स्वातिजा परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ३० जणांनी विरोध केला आहे. बीफ म्हणजेच गोमांसावरची बंदी हटवावी, अशी त्यांची मागणी आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंग या त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत. गाय आणि बैलांची कत्तल जर महाराष्ट्राच्या बाहेर झाली असेल तर मात्र बीफचा साठा करणं हा गुन्हा नाही, या कोर्टाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारनेही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या याचिकांच्या सुनावणीवर कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.