खासदार सुब्रमण्यम स्वामी नरेंद्र मोदींवर नाराज , म्हणून चीनला जाण्याची व्यक्त केली इच्छा

केंद्रातील नरेंद्र मोदीसरकार आपले विचार ऐकत नसल्याने भाजपचे नेते, खासदार सुब्रमण्यम स्वामी प्रचंड नाराज आहेत. नमोंना माझे विचार ऐकायचेच नसेल तर मी चीनला जाईन, असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे. भाजपच्या दुसऱ्या टर्ममध्येही महत्त्व मिळत नसल्याने सुब्रमण्यम स्वामी नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी २९ जून रोजी ट्विट करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे. ‘चीनच्या प्रसिद्ध सिंघुआ विद्यापीठात सप्टेंबरमध्ये स्कॉलर्सचं संमेलन होणार आहे. त्यात ‘गेल्या सात वर्षातील चीनच्या आर्थिक विकासाची समीक्षा’ या विषयवार विचार मांडण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं आहे. नमोंना माझे विचार जाणूनच घ्यायचे नसतील तर मी चीनला व्याख्यानासाठी जाऊ शकतो,’ असं ट्विट स्वामी यांनी केलं आहे.
दरम्यान, स्वामी यांच्या ट्विटर एका यूजर्सने तुम्ही राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणं सोडा, नमो खूश होतील, अशी कमेंट केली आहे. त्यावर राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलणं थांबवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यावेळी स्वामींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर टीका केली होती.