विधान परिषद : धनगर आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा गदारोळ

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाबाबत जोपर्यंत दिलगिरी व्यक्त करणार नाही, तोवर कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने घेतल्याने सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज ठप्प झाले. गुरूवारचे अनेक तास वाया जातानाच सभागृहाचे कामकाज मध्यांतरनंतर तहकूब झाले होते. दुसऱ्या दिवशीही सभागृहात याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. विधानपरिषदेत आजही प्रचंड गदारोळ झाला. आजही धनगर आरक्षणावरून गुरुवारी विरोधकांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी आजही लावून धरली. त्यामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोनवेळा अर्ध्या तासासाठी आणि अखेरीस दिवसभरासाठी तहकुब करावे लागले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच परिषदेत सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घातला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. विधान परिषदेत १६ मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार असल्याने या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाहक गोंधळ घातला अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. ”सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करतो,” असे मुंडे म्हणाले. ”विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच सरकारची नियत कळते,”अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
विधान परिषदेच्या सभागृहाची एक वेगळी प्रतिमा आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांकडूनची अशी वर्तवणूक ही अशोभनीय आहे. अशा परिस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालणे शक्य दिसत नाही अशी नाराजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. ”सभागृहातील गटनेत्यांनी बैठक येत्या सोमवारी सकाळी बोलवून कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी काय तोडगा काढता येईल हा प्रयत्न केला जाईल”, असे निंबाळकर म्हणाले.