अलवर मॉब लिंचिंग प्रकरण : आरोपपत्रात टाकले मृत पिडिताचेही नाव , राजस्थान सरकारवर टीकास्त्र

राजस्थानमधील अलवर येथे २०१७ मध्ये झालेल्या मॉब लिंचिंगने सर्व देश हादरून गेला. गोरक्षकांच्या हल्ल्यात यावेळी पहलू खान यांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये राजस्थानमध्ये भाजपचं सरकार होतं आणि वसुंधराराजे शिंदे या मुख्यमंत्रीपदी होत्या. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात गोरक्षकांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पहलू खान यांच्या नावाचा देखील समावेश आहे. १ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या हल्ल्यात पहलू खान या ट्रक मालकाचा मृत्यू झाला होता. पण, आता राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत असून मृत पहलू खान यांचं नाव आरोपपत्रात आल्यानं टीका होताना दिसत आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याची आरोपपत्र काँग्रेसच्या काळात दाखल करण्यात आली. ३० डिसेंबर २०१८मध्ये ही चार्जशीट तयार करण्यात आली. २९ मे २०१९ रोजी ही आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. यामध्ये पहलू खान आणि त्यांचे दोन मुलं यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत.
या आरोपपत्रात पहलू खान यांचा मुलगा इरशादचं नाव देखील आहे. ‘गोरक्षकांच्या हल्ल्यात आम्हाला वडिलांना गमवावं लागलं आणि आता आमच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आम्हाला आशा आहे राजस्थानमधील काँग्रेस सरकार यावर विचार करेल. आम्ही अशोक गेहलोत सरकारकडून न्यायाची अपेक्षा केली होती’, अशी प्रतिक्रिया इरशादनं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. तर, अकबरूद्दीन ओवैसी यांनी देखील ट्विटवरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. राजस्थानमध्ये भाजप सरकार सत्तेत असताना देखील अशाच एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. पहलू खान यांचे सहकारी अजमत आणि रफिकविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.