२०१९ मध्ये पाच वर्षांतली कामे पाहून आम्हाला बहुमत: मोदी

२०१४ मध्ये मागील सरकारपासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले, पण यावेळी आमची पाच वर्षांतली कामे पाहून आम्हाला मागील वेळेपेक्षाही अधिक बहुमताने निवडून दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला मोदी उत्तर देत होते. भ्रष्टाचारविरोधातला आमचा लढा सुरूच राहणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विरोधकांवर मोदींनी सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘आमची उंची कोणी गाठू शकत नाही. आम्ही कुणाची रेघ लहान करण्यात वेळ घालवत नाही, उलट स्वत:ची रेघ मोठी करण्यात आयुष्य वेचतो. तुम्ही इतक्या उंचीवर गेलात की तुम्हाला जमीन दिसत नाही.’ ते सरकारच्या कामांविषयी बोलताना म्हणाले, ‘आमच्या सरकारला केवळ ३ आठवडे झालेत, पण अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. पाण्याच्या संकटाची आमचं सरकार गांभीर्याने दखल घेणार आहे. कारण शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीतल्या पारंपरिक पद्धतींतून आपण बाहेर यायला हवं.’ राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण पू्र्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहनही मोदींनी केले.