आयसीसीने विराट कोहलीला का आणि किती केला दंड ?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात अनावश्यक अपील करणे म्हणजे नियमाचं उल्लंघन करणे आहे. याअंतर्गत विराट कोहलीवर सामन्याच्या शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीने रविवारी याबाबत अधिकृतरित्या जाहीर केलं. विराट कोहली हा आचार संहिता उल्लंघनाच्या लेव्हल-१ चा दोषी आहे, असं आयसीससीने सांगितलं. आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये २३ जूनला शनिवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना रंगला. या सामन्यात भारताने ११ धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या सामन्यात २९ व्या षटकात कोहलीने अंपायर अलीम डार यांच्याजवळ जाऊन आक्रमकरित्या आणि चुकिच्या पद्धतीने एलबीडब्ल्यूची अपील केली होती. यामुळे कोहलीने आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलं, असं आयसीससीने सांगितलं.
या प्रकरणी कोहलीनेही त्याची चूक कबूल केली. त्याने दंडही स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनवाईची गरज नाही. दंडाव्यतिरिक्त या घटनेनंतर आयसीसीने कोहलीच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंटही जोडला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये रिवाइज्ड कोड लागू झाल्यानंतर कोहलीची ही दुसरी चूक आहे.
सध्या कोहलीच्या खात्यात दोन डिमेरिट पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट त्याला जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या टेस्ट सामन्यादरम्यान मिळाला होता.