मुंबईतील बैठकीसाठी गेलेले परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते परस्परांना भिडले !!

लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या पार्श्वभुमीवर सतत बैठका घेतल्या जात आहेत. आज २३ जून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या परभणीतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामुळे राष्ट्रवादी भवनाच्या मुख्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती असे वृत्त टीव्ही ९ या वाहिनीने दिले आहे.
मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव कुणामुळे झाला, यावर चर्चा करत असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर परभणीतील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामुळे काहीकाळासाठी राष्ट्रवादी भवनाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शरद पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.