Mujffarpur : चमकी तापाच्या बलोनची संख्या १२९, वरिष्ठ डॉक्टरचे निलंबन , हलगर्जीपणाचा आरोप

मुजफ्फरपूर येथे चमकी तापाच्या बळींचा आकडा आता १२९वर पोहोचला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असून येथील श्रीकृष्णा मेडिकल महाविद्यालयाचे वरिष्ठ डॉक्टर भीमसेन कुमार यांना निलंबित करण्यात आलं आहे. ढिसाळ प्रशासन आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चमकी तापाचा मुजफ्परपूरमध्ये वेगाने प्रसार झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे.
मुजफ्फरपूर येथे चमकी तापाचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहित असूनसुद्धा या रोगाला पायबंद घालण्यासाठी जी पाऊलं उचलायला पाहिजे होती ती उचलली गेली नाहीत. यामुळे हा आजार वेगाने पसरला. रुग्णांसाठी येथील रुग्णालयांमध्ये जागा उरलेली नाही. तसंच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. येथील रुग्णालयांमधील डॉक्टर, कम्पाऊडर आणि परिचारिकांची अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत. बराच काळ राज्य सरकारनेही या प्रकरणाकडे कानाडोळा केला होता. आता मात्र राज्य सरकारने याप्रकरणी लक्ष घातलं असून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.
मुजफ्परपूर येथे डॉक्टरांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे पाटण्याहून वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही बोलावण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजीहूनही तज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. रुग्णांना जास्तीजास्त सुविधा देता येतील असा प्रयत्न सरकार करतं आहे. नितीश कुमारांनी स्थानिक रुग्णालयांची पाहणी केली आहे. सीपीआय नेता कन्हैय्या कुमारला मात्र रुग्णांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. योग्य वेळी जर पावलं उचलली असती तर चमकी तापाला आळा घालता आला असता. पण बिहार सरकारच्या हलगर्जीपणामुळेच हा आजार पसरल्याचा आरोप करण्यात येतो आहे. विरोधी पक्ष नेत्या राबडी देवी यांनी चमकी तापामुळे रुग्ण मेले नसून त्यांची हत्या झाली आहे असा आरोप केला आहे.