Kashmir : शोपियानमध्ये चकमक; ४ दहशतवादी ठार

दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये आज सकाळी झालेल्या धुमश्चक्रीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात ही चकमक झाली. दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर सुद्धा या ठिकाणी सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरूच आहे. बारामुला जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ‘जैश ए मोहम्मद’चा दहशतवादी ठार झाला होता. बारामुला जिल्ह्यातील उरीत मारल्या गेलेला हा दहशतवादी ‘जैश’चा टॉप कमांडर लुकमान होता. तो दक्षिण काश्मीरहून उत्तर काश्मीरच्या दिशेने जात होता. पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करायला जात असताना सुरक्षा दलाने त्याचा खात्मा केला.
सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शुक्रवारपासून चकमक झाडात आहे. शोपियानमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्याने सुरक्षा दलावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने गोळीबार केला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत चार दहशतवादी ठार झाले असून या परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे.