धक्कादायक : पत्नी आणि तीन मुलांची निर्घृण हत्या , ३५ वर्षीय शिक्षक अटकेत

पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्या प्रकरणी एका ३५ वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात शनिवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. सर्वप्रथम आरोपीच्या सासूने घरामध्ये मृतदेह पाहिले. त्यांनी लगेच शेजाऱ्यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. आरोपी उपेंद्र शुक्ला मृतदेहांसोबत त्यावेळी रुममध्ये होता असे आरोपीच्या सासूने पोलिसांना सांगितले.
उपेंद्र शुक्ला खासगी शिकवणीचे क्लासेस घेतो. त्याने चाकूने पत्नी, दोन मुली आणि मुलाची गळा चिरुन हत्या केली. उपेंद्रची मोठी मुलगी सात वर्षांची होती. मुलगा पाच वर्षांचा आणि मुलगी दोन महिन्यांची होती. आर्थिक संकटामुळे उपेंद्रला नैराश्य आले होते असे प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
पोलिसांना सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी या हत्याकांडाची माहिती मिळाली. उपेंद्रने रात्रीच पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली. चिठ्ठीमधून उपेंद्रने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली असे दक्षिण दिल्लीचे डीसीपी विजय कुमार यांनी सांगितले. उपेंद्र खासगी शिकवणी घ्यायचा. आरोपीने हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.