नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न , वाचविणारा पोलिसही जखमी

नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, पोलिसांच्या प्रयत्नांमुळे अनुचित प्रकार टळला असून संबंधित युवक आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत.
योगेश चांदणे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव आहे. योगेश नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करणार असल्याचे ओरडत होता. या घटनेबद्दल समजताच पोलिसांनीही गच्चीवर जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने उडी मारल्यास त्याला झेलण्यासाठी पोलिसांनी खाली कापडाच्या जाळ्या केल्या होत्या. तसेच मदतीसाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, एक पोलीस अधिकारी संबंधित तरूणाला समजावत असताना मागून स्वप्निल मंडलिक या पोलीस कर्मचाऱ्यानी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु योगेश याने टाकीच्या कठड्याकडे उडी घेतल्याने दोघेही खाली पडून जखमी झाली. सध्या दोघांनाही उपचारासाठी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.