चर्चेतला बातमी : महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री , भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांचे शिवसेनेला उत्तर

विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असं वक्तव्य महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या नेत्यांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या भाषणात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा सरोज पांडे यांनी केली आहे.
सरोज पांडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून जुंपणार का? हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता मुख्यमंत्री कोण होणार हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे असे सूचक उत्तर दिले आहे. तर लोकसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यामुळे भाजपाच मोठा भाऊ आहे असं वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केलं आहे. आता या सगळ्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन असताना त्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्यमंत्री कोण होणार? पुढे काय होणार याची चिंता तुम्ही करू नका आमचं सगळं काही ठरलं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा विषय तूर्तास गौण आहे असंही ते म्हटले होते. तर आमचं सगळं ठरलं आहे सगळं काही समसमान होईल हे मुख्यमंत्र्यांनाही ठाऊक आहे असं उद्धव ठाकरे म्हटले होते.
भाजपच मोठा भाऊ : पूनम महाजन
या सगळ्याला दोन ते तीन दिवस उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असं वक्तव्य सरोज पांडे यांनी केलं आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजपाच मोठा भाऊ आहे असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. आता या सगळ्या चर्चेनंतर आमचं सगळं ठरलं आहे असं म्हणणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आज झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, विनोद तावडे, सरोज पांडे, खासदार पूनम महाजन यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.