प्रभू राम फक्त हिंदूंचे पूर्वज नसून मुस्लिमांचे ही पूर्वज ,हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच : बाबा रामदेव

हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. मुस्लिम आमचे बांधव असून आमचे पूर्वज एकच आहेत. त्यामुळे प्रभू राम फक्त हिंदूंचे पूर्वज नसून मुस्लिमांचे ही पूर्वज असल्याचे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. पूर्वजांचा सन्मान करायला हवा असे सांगत राम मंदिर बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाबा रामदेव उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते.
बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रभू राम हे राष्ट्राचे पूर्वज आहेत. आस्था ही मोठा बाब असून त्यावर आघात करता कामा नये. सुप्रीम कोर्टाने राम मंदिर वादाबाबत चर्चेसाठी मध्यस्थ नेमला असला त्यातून फार निष्पन्न होत नसल्याचे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले. राम मंदिर निर्माणासाठी दुसरा पर्याय म्हणजे लोकांनीच पुढाकार घेऊन मंदिर निर्माणाचे कार्य हाती घेतले पाहिजे. मात्र, त्यालाही काहीजण विरोध करणार असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले. राममंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने लवकरात लकवर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राम मंदिर निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.