धनादेश अनादर प्रकरणात बिग बॉस मधील चर्चित स्पर्धकअभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांकडून अटक

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो गाजवत असलेला साताऱ्यातील स्वयंघोषित राजकीय नेता अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. एका जुन्या चेक बाउन्स प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. बिचुकलेंना उद्या सातारा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की त्याचा प्रवास इथेच संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बिचुकले हा ‘बिग बॉस’मधील सर्वाधिक चर्चित स्पर्धक आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील अन्य स्पर्धकांसोबत त्याचे रोजच्या रोज वाद झडत होते. स्वत:ला महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणारा बिचुकले त्याच्या विरोधात काहीही सहन करण्याच्या मनस्थितीत नसायचा. अन्य स्पर्धकांशी तो नेहमीच चढ्या आवाजात वाद घालताना दिसायचा.
अलीकडंच बिचुकलेनं शोमधील एक स्पर्धक रुपाली भोसले हिच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. महिला वर्गात याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या बाहेर काढण्याचे आदेश द्या, अशी विनंती केली होती.
हे सगळं सुरू असतानाच चेक बाउन्स प्रकरण उजेडात आलं. त्याच्या विरोधात साताऱ्यातील स्थानिक न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर सातारा पोलिसांनी बिचुकलेच्या अटकेसाठी थेट मुंबई गाठली आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. अटकेमुळं बिचुकलेची ‘बिग बॉस’मधील इनिंग संपणार की तो पुन्हा एन्ट्री घेणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.