Himachal Pradesh : बस दरीत कोसळून हिमाचल प्रदेशात 30 जणांचा मृत्यू, 25 जखमी

हिमाचल प्रदेशात एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात बसमधल्या 20 प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर 25 जण गंभीर जखमी आहेत. एका वळणावर बस तब्बल 500 फुट खोल असलेल्या दरीत कोसळून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली . हिमाचलमधल्या कुल्लू जिल्ह्यात हा अपघात झाला. बसमध्ये 60 प्रवासी होते. ही खासगी बस होती. बंजारवरून ही बस गडागुशानी इथं जात होती. हा रस्ता खराब असून घाटवळणाचा आहे. एका वळणावर ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्याला सुरुवात करून दरीत कोसळलेल्या नागरिकांना बाहेर काढलं. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.
दरी खोल असल्याने आणि झाडी असल्याने मदत कार्यात अडथळे पार करून मदत पथकाला घटनास्थळी जावं लागलं. जिथे बस पडली तिथे खाली नदी होती. त्या भागात दगडांचं प्रमाणही जास्त असल्याने लोकांना जास्त मार लागला. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढताना मदत पथकाला कसरत करावी लागली.
बसच्या टपावरही लोक बसले होते अशी माहितीही स्थानिकांनी दिली आहे. या भागात रस्ते हे घाटाचे आणि वळणाचे असल्याने बस आणि ड्रायव्हर हा चांगला पाहिजे अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. मात्र अनेकदा बसची देखरेख ठेवली जात नाही. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होते.