ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानातील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची १७व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ आपला पदभार स्विकारला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बिर्ला यांच्या कार्याची ओळख करुन देत त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच सभागृहात लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांचे नाव सुचवले होते. त्याला काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, द्रमुक आणि बिजू जनता दल या प्रमुख विरोधी पक्षांसह इतर सर्वच पक्षांनी पाठींबा दर्शवला होता.
बिनविरोध निवड झाल्यानंतर लोकसभेत बिर्ला यांचा परिचय करुन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड ही सभागृहासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करतो, अनेक खासदार त्यांचे चांगले ओळखतात. त्यांनी यापूर्वी राजस्थान सरकारमध्येही काम केले आहे.
मोदी म्हणाले, मी वैयक्तिकरित्या ओमजींसोबत अनेक वर्षे काम केले आहे. ते राजस्थानातील कोटाचे प्रतिनिधीत्व करतात. हे शहर एक प्रकारे मिनी भारतच आहे. त्यांनी आपले सार्वजनिक जीवन एक विद्यार्थी नेता म्हणून सुरु केले होते. त्यानंतरही ते अद्यापर्यंत अव्याहतपणे समाजासाठी काम करीत आहेत.