Aurangabad Police : “परफार्मन्स” बघूनच ठरवला जाईल आता बदलीचा निर्णय : पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद

औरंगाबाद शहर पोलिसांच्या हद्दीत यापुढे शहर पोलिस कर्मचार्यांना बदली झाल्यानंतर परफार्मन्स द्यावा लागेल अन्यथा त्यांच्याबदलीचा पुर्नविचार होईल अशी माहिती पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली.
पोलिस आयुक्तालयातील सुमारे पाचशे कर्मचा-यांच्या विनंती आणि कार्यकाळ संपल्यामुळे बदल्या करण्यात आल्या आहेत. पंधरवडा उलटूनही अद्यापपर्यंत बदली कर्मचा-यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही.या विषयी बोलतांना प्रसाद म्हणाले की, यापुढे कोणत्याही ठिकाणी बदली झाल्यानंतर त्या कर्मचार्याचा परफार्मन्स पाहिला जाईल.जर तो योग्य असेल तरच त्याची सेवा त्याविभागात पूर्ण करण्याची संधी त्याला दिली जाईल नसता पुन्हा ताबडतोब बदली करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणचा कार्यकाळ संपल्यावर बदली झाल्याने ती रद्द करण्यासाठी काही कर्मचारी अधिका-यांकडे पाठपुरावा करत असल्याची देखील चर्चा आहे.
पोलिस आयुक्तालयातील १८ पोलिस ठाण्यांमधील सुमारे पाचशे कर्मचा-यांच्या ३१ मे आणि १ जुन रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. यापुर्वी २० फेब्रुवारी रोजी विशेष शाखा आणि गुन्हे शाखेतील १६ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या यादीतील काही कर्मचारी तात्काळ सोडण्यात आले. तर काही कर्मचा-यांना थांबविण्यात आले. मे महिन्याच्या अखेरीस पोलिस मुख्यालय, वाहतुक शाखा, पोलिस ठाणे, मोटार परिवहन विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर १ जुन रोजी गुन्हे शाखेतील २३ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील काही कर्मचा-यांच्या बदल्या पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी रद्द करुन नव्याने यादी जाहीर केली.
बदल्यांमध्ये घोळ होऊ नये यासाठी पोलिस आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून कर्मचा-यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. त्यानंतरच त्यांच्या आदेशाने काही जणांच्या बदल्या रद्द करुन नव्याने काही कर्मचा-यांना जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, असे असतानाही पंधरवडा उलटूनही कर्मचा-यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचारी पाठपुरावा तर करत नाहीत ना अशी चर्चा सुरू आहे.