शोकांतिका : कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून हुगळी नदीत उतरलेला ‘तो’ जादूगार वर आलाच नाही !!

कोलकातामधील हुगली नदीत बुडून ४१ वर्षीय जादुगाराचा मृत्यू झाला आहे. चंचल लाहिरी असं या जादुगाराचं नाव असून जादूगार मँड्रेक नावाने ते प्रसिद्ध होते. नातेवाईक, मीडिया, पोलीस आणि अनेक लोकांच्या उपस्थितीत क्रेनच्या सहाय्याने ते नदीत उतरले होते. कुलूपांनी बंदिस्त पिंजऱ्यातून ते नदीत उतरले होते. पण बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने शोध सुरु कऱण्यात आला होता. अखेर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर आला आहे.
सहा वर्षांपुर्वी २०१३ मध्येही त्यांनी हा स्टंट केला होता. त्यावेळी त्यांना उपस्थितांनी हुल्लडबाजी करत बराच त्रास दिला होता. आपण या जादूची ट्रिक पाहिली असल्याने फसवणूक झाल्याचा दावा उपस्थितांनी केला होता.
स्टंट सुरु होण्याआधी बोलताना चंचल लाहिरी यांनी २१ वर्षांपुर्वी याच ठिकाणी आपण असाच स्टंट केला होता असा दावा केला होता. ‘मी एका बुलेटप्रूफ ग्लास बॉक्सच्या आतमध्ये होतो. आपले हात आणि पाय साखळीने बांधण्यात आले होते. हावडा ब्रीजवरुन आपल्याला खाली उतरवण्यात आलं होतं. २९ सेकंदात पाण्याबाहेर येत आपण स्टंट पूर्ण केला होता’, असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. मात्र यावेळी स्टंट करणं कठीण असू शकतं अशी कबुली त्यांनी दिली होती. ‘जर मी हे खोलू शकलो तर जादू, पण जर नाही करु शकलो तर शोकांतिका’, असंही ते म्हणाले होते.
स्टंट सुरु झाल्यानंतर बराच वेळ होऊनही चंचल लाहिरी बाहेर आले नाहीत तेव्हा गोंधळ उडण्यास सुरुवात झाली होती. काही लोकांनी आपण नदीच्या मध्यभागी एका व्यक्तीला मदतीसाठी झगडत असल्याचं पाहिलं असल्याचा दावा केला होता. पोलिसांना माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.