Maharashtra : अर्थसंकल्प फुटलेला नाही; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

अर्थसंकल्प फुटलेला नाही. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अर्थसंकल्पाबाबत वेगवानपणे ताजे अपडेट्स देत आहोत. यावरून विरोधकांचा गैरसमज झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधानसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडत असतानाच अर्थसंकल्प ट्विटरवर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलं. गोंधळानंतर विरोधकांनी सभात्याग केला. दरम्यान, अर्थसंकल्पाचा पहिला भाग संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उभे राहत विरोधकांच्या आरोपावर सरकारच्यावतीने स्पष्टीकरण दिलं.
अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्यातील महत्त्वाच्या तरतुदी ट्विटरवर पोस्ट करण्यात येत आहेत. अर्थमंत्र्यांचे भाषण आणि या पोस्टमध्ये दोन ते तीन मिनिटांचं अंतर राखण्यात आलं आहे. एकही पोस्ट आधी शेअर करण्यात आलेली नाही. आम्ही केवळ नव्या माध्यमाचा वापर करून वेगवान अपडेट्स जनतेला देत आहोत. त्यामुळे अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला हा विरोधकांचा आरोप निरर्थक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असतानाही अशाप्रकारे ट्विटरच्या माध्यमाचा वापर करण्यात आला होता, असेही मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. आमच्याप्रमाणे विरोधकांनीही नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. विरोधकांनी सभागृहात यावे व अर्थसंकल्प जाणून घ्यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.