मंत्री मंडळ विस्तार मुख्यमंत्र्यांचे तळ्यात मळ्यात , इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे निर्णय घेणे झाले अवघड !!

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे दिल्यास ‘जुने आणि नवे’ वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार टाळण्याची खेळी खेळल्याचे सांगण्यात येते. भाजप आणि शिवसेनेतील अनेक टर्म आमदार असलेले नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. काहींनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केले होते. या सर्वांना विस्तारात सामावून घेणे कठीण असल्याने विस्तार बारगळला असल्याचे कळते.
काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अब्दुल सत्तार आदींनी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे काम केले होते. अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट हे पुण्यातून खासदार झाले. त्यामुळे या मंत्रिपदाबरोबर भाजप-शिवसेनेची काही मंत्रिपदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोलले जात होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विस्ताराची तारीखही जाहीर केली. मात्र, राज्यात दुष्काळ असताना मंत्रिमंडळ विस्तारावरून वाद होऊ नयेत यासाठी विस्तार न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरविले आहे. त्यामुळे बापट यांच्याकडील संसदीय कार्य आणि अन्न व नागरीपुरवठा ही खाती विनोद तावडे आणि जयकुमार गोरे या मंत्र्यांकडे दिली आहेत. विस्तार केला तर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे विस्तार न करता मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.