नाशिकमध्ये दरोडेखोरांचा भर दिवसा गोळीबार , एक ठार

शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, शुक्रवारी, १४ जूनला भरदिवसा चार सशस्त्र दरोडेखोरांनी उंटवाडी भागात असलेल्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला. हा प्रकार लक्षात येताच व्यवस्थापकाने प्रसंगावधान दाखवत सायरन वाजवला. मात्र, त्यामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचा एक कर्मचारी ठार झाला. त्यानंतर चौघेही दरोडेखोर फरार झाले. या घटनेमुळे नाशिकमधील बिहारराज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मुथूट फायनान्स कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास चौघा दरोडेखोरांनी शिरकाव केला. या सर्वांकडे पिस्तुल होते. तर, एकाच्या हाती कुऱ्हाड होती. दरोड्याचा प्रयत्न लक्षात येताच बँकेचे व्यवस्थापक सी. डी. देशपांडे यांनी सायरन वाजवला. त्यामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच, एका कर्मचाऱ्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यात हा कर्मचारी जागीच ठार झाला. दरोडेखोरांमधील दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. या घटनेवेळी ग्राहकांसह एकूण ८ कर्मचारी कार्यालयात होते. दरोडेखोरांनी कार्यालयात शिरताच सर्वांचे मोबाईल ताब्यात घेत पैशांची मागणी केली.