शासकीय जमीन हडपल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिला आहे. सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्या. पी. व्ही. नलावडे व न्या. मंगेश पाटील यांनी दिले आहेत.
धनंजय मुंडे यांनी १९९१मध्ये जगमित्र शुगर फॅक्ट्रीसाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात राजाभाऊ फड यांनी (रत्नाकर गुटे यांचे जावई) तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे. गिरी, देशमुख व चव्हाण या तिघांमध्ये जमिनीवरून वाद होता. जमिनीच्या विक्रीचे अधिकार देशमुख व चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही जमीन खरेदी केली होती. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ही विनंती कोर्टाने मान्य केली.
१९९१मध्ये सरकारी दप्तरात या जमिनीची नोंद इनामी जमीन म्हणून नव्हती. या वादाची आम्हाला माहिती नव्हती. विक्री करण्याचा मालकी हक्क देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली, असे मुंडे यांचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले. केवळ राजकीय द्वेषातून आरोप करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचेही सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.