नरेंद्र मोदींनी देशात द्वेष आणि विभाजनाचे विष पसरवले आणि लोकांशी खोटे बोलून निवडणूक जिंकले- राहुल गांधी

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तिरस्कार आणि विभाजनाचं विष पसरवलं असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. वायनाड या ठिकाणी ते शुक्रवारपासून दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी आज लोकांशी संवाद साधला. वायनाड या ठिकाणाहून राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कठोर शब्द वापरले. मात्र त्यांनी विभाजन आणि तिरस्कार या दोन गोष्टींचं विष पसरवलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांशी खोटं बोलून निवडणूक जिंकले असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमध्ये आले आहेत. या ठिकाणी ते तीन दिवस दौरा करणार आहेत. आज लोकांशी संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाबाबत बोलताना पातळी सोडली. त्यांच्या भाषणातून फक्त राग आणि द्वेष पसरवला जात होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आम्ही राष्ट्रीय पातळीवर विष पसरवणाऱ्या एका माणसाशी लढत होतो, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
वायनाडमधल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसंच वायनाडच्या प्रत्येक नागरिकासाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे सदैव उघडे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. वायनाडच्या माणसाचं वय काय? त्यांची विचारधारा काय? याचा विचार आम्ही करणार नाही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाडच्या कालपेट्टा या ठिकाणी रोड शो केला त्यानंतर लोकांशी संवाद साधत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.